त्या बोचऱ्या क्षणांचे.....का ठाव सापडावे
धुंदीत हासताना.....मी का उगी रडावे..
सांगू कसे कुणाला.....हे शल्य या मनीचे
मी पंख कापलेल्या.....पक्षापरी उडावे..
जो आपुलाच नाही.....दृष्टीस तो दिसावा
नात्यास भार होण्या.....का जीव हे जडावे..
एकांत शोधण्याला.....धुंडाळतो दिशा मी
अस्तित्व का स्वतःचे.....माझे मला नडावे..
स्वच्छंद तैरतो मी.....मासा जसा जलात
का जाल वेदनांचे.....माझ्यावरी पडावे..
हा वृक्ष जीवनाचा.....आक्रंदतो रुसोनी
का पर्ण ते सुखाचे.....दैवातुनी झडावे..
-------------- वैभव फाटक --------------
No comments:
Post a Comment