मराठी ब्लॉग विश्व

Monday 26 March 2018

हार माझी चकाकती आहे

जिंकल्याचीच पावती आहे 
हार माझी चकाकती आहे 

सांगतो लोचनातला अश्रू 
वेदना आत वाहती आहे 

स्वप्न पाहून पूर्ण झाल्यावर 
रामप्रहरास अनुमती आहे 

वेग नुसता जबाबदाऱ्यांचा
जाणिवांना कुठे गती आहे? 

काय दोषी ठरेल आरोपी? 
भोगणारा तिचा पती आहे 

वैभव फाटक ( २ डिसेंबर २०१७)

Saturday 21 May 2016

हास्य-गझल

दोस्त दोघे एक मी अन एक तू
सातवी नापास मी, बीटेक तू

माहिती आहे तुझ्याबद्दल तिला
काळजी घेऊन थोडी, फेक तू

घे जरा वाटून कामे आजही
मी चपाती लाटतो अन शेक तू

ती भले 'मिस वर्ल्ड' तुझ्यासाठी, तिला
वाटतो आहेस का अभिषेक तू ?

पाहिजे असतील जर श्रोते तुला
सूर सांभाळून थोडे रेक तू

वैभव फाटक ( २१-०५-२०१६)

Tuesday 17 May 2016

पुन्हा तू भेटण्याचा वार ठरलेला

पुन्हा तू भेटण्याचा वार ठरलेला
पुन्हा हृदयात हाहाकार ठरलेला

करावी तू स्तुती माझी, तुझी मीही
तुझ्यामाझ्यात हा  व्यवहार ठरलेला

किती साच्यात आयुष्यास ओतावे
तरी घेईच ते आकार ठरलेला

निघाला दूर लाचारी कराया तो
बिचारा एकटा लाचार ठरलेला

दिसू शकणार नाही सर्व डोळ्यांनी 
दिव्याखाली सुधा अंधार ठरलेला 

कितीवेळा पुढे मी ठेवले पेढे
विसरला देव भ्रष्टाचार ठरलेला 

वैभव फाटक (१६-०५-२०१६)

Saturday 4 July 2015

पाहिली काल आग डोळ्यांनी

पाहिली काल आग डोळ्यांनी
स्वप्न केले महाग डोळ्यांनी

संपली बोलण्यातली ताकद
तू अता हक्क माग डोळ्यांनी

गुंगले मैफिलीत सारेजण
गायला मी 'बिहाग' डोळ्यांनी

लागले जर मनास या चटके
दिसत नाहीत डाग डोळ्यांनी

सांगते नार या समाजाला
थांबवा पाठलाग डोळ्यांनी

वैभव फाटक 

Friday 3 April 2015

रोज होतोच वाद एखादा

रोज होतोच वाद एखादा
रोज होतोच बाद एखादा

साथ तू सोडलीस माझी पण
घालतो रोज साद एखादा

घालणारे किती इथे पूजा
वाटणारा प्रसाद एखादा

जीवनाला कलाटणी देतो
देत उत्स्फूर्त दाद एखादा

माफ केली तुझी किती पापे
सोड माझा प्रमाद एखादा

वैभव फाटक

Thursday 8 January 2015

होय श्रद्धा महागली आहे

भेटवस्तूत तोलली आहे
होय, श्रद्धा महागली आहे

ठेव विश्वास आज त्याच्यावर
आज हातात बाटली आहे

गुंफ शेरास तू शिताफीने
तोकडी ही लगावली आहे

तू तिथे गाळलेस अश्रू अन
वीज येथे कडाडली आहे

आजवर जी पहातही नव्हती
आज ती चक्क लाजली आहे

वैभव फाटक, वापी ( ०७-०१-२०१५)

Monday 28 July 2014

गार्‍हाणी देवास घातली होती

गार्‍हाणी देवास घातली होती
देवाने समजूत काढली होती

स्वप्न गुलाबी पूर्ण पाहता आले
प्रभा उजाडायची थांबली होती

तेव्हाही होती रक्ताची नाती
फक्त त्यातली दरी वाढली होती

मागमूस नाही जेथे छायेचा
अशा दिशेने उन्हे चालली होती

तिची कहाणी तशी पाहता मोठी
पण काही अश्रूत मावली होती 

पळून गेली जरी थोरली कन्या
फळे धाकटीनेच भोगली होती

वैभव फाटक ( २८ जुलै २०१४)