मराठी ब्लॉग विश्व

Sunday 24 June 2012

कात

लाख दु:खे उंबऱ्याशी ठाकली
त्यात तू पेटी सुखाची झाकली

वादळाला जिंकले तेव्हाच मी
नाव पाण्यातून जेव्हा हाकली

दु:ख की आनंद व्हावा, ऐकुनी ?
"थोरली कन्या नको, द्या धाकली"

भार जेव्हा आठवांचा जाहला
मी नव्याने कात तेव्हा टाकली

वाहिली नाहीत ऐसी रोपटी,
रोपटी जी, वेळ येता वाकली

वैभव फाटक ( २४ जून २०१२)

Monday 18 June 2012

एक मी अन एक तू

दोस्त दोघे एक मी अन एक तू
मी किती करतो गुन्हे पण, 'नेक' तू


लष्कराची भाजताना भाकरी
विस्तवावर हात थोडे शेक तू

पाहुया मासा अता जातो कुठे ?
फक्त पाहुन वेळ, जाळे फेक तू

का तुझी प्रत्येक मैफिल बेसुरी ?
सूर आळव अंतरी दिलफेक तू

पर्वतांवर जायचे आता तुला
पार केल्या टेकड्या कित्येक तू

( वैभव फाटक - १८ जून २०१२ )

Thursday 7 June 2012

तुझ्याचसाठी

तारेवरची कसरत सारी तुझ्याचसाठी
दुनियेसंगे मारामारी तुझ्याचसाठी

तसे कुणाचे तीळमात्रही ऐकत नाही
किती पचवले बोल जिव्हारी तुझ्याचसाठी

लाख चेहरे घुटमळणारे अवतीभवती
तरी फुंकली प्रीत तुतारी तुझ्याचसाठी

तुझ्या लोचनी अश्रू बघणे जमले नसते
मी दु:खाची दिली सुपारी तुझ्याचसाठी

तुझ्या सुखातच श्रीमंती मी मानित आलो
पत्करलेली किती उधारी तुझ्याचसाठी

------- ( वैभव फाटक - ५ जून २०१२) -------

Friday 1 June 2012

आताशा


जरी गातो, तरी नाही सुरांचे भान आताशा
जनांचे राहुद्या, माझेच किटले कान आताशा

जरासा स्पर्श करता तू , विडा रंगायचा तेव्हा
अता कळले, मजा का देत नाही पान आताशा

जिभेचे चोचले पुरवायला हॉटेलच्या वाऱ्या
विसरलो भाकरी, खाऊन 'रोटी' 'नान' आताशा

किती होई सुनेला त्रास, सासूच्या रहाण्याने
चरायाला मिळेना मोकळाले रान आताशा

उभे आयुष्य गेले, ताठ बाणा सोडला नाही
भितीने मोडण्याच्या, वाकलेली मान आताशा

नसे खाण्यास काहीही, उपाशी राहतो हल्ली
नशीबी वाढलेले रोजचे 'रमजान' आताशा

-------- वैभव फाटक ( १ जून २०१२) ---------