मराठी ब्लॉग विश्व

Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Monday, 18 November 2013

करणे जमले नाही

मी प्रयत्न कितिदा केला पण करणे जमले नाही.
तत्वांवर खोटा बुरखा पांघरणे जमले नाही.
तोऱ्यात अशा वावरतो की मीच जगाचा राजा
वास्तवात नाचत नाही कोणी तालावर माझ्या

मी प्रेम कराया गेलो तेथेही पुरता फसलो
ना दोष कुणाला देता मी नशिबावरती हसलो
मी किती उन्हे पत्करली जखमांच्या भरण्यासाठी
सर येते आठवणींची त्या ओल्या करण्यासाठी

वाऱ्याने अलगद उडते त्या पानागत मी आहे
धागा तुटलेला ज्याचा तो पतंग जणु मी वाहे
पापण्यात माझ्या भरले दु:खाचे हळवे मोती
ते येण्यासाठी कारण ही फसवी नाती -गोती

वैभव फाटक ( १८ नोव्हेंबर २०१३ )

Sunday, 7 October 2012

जाहले जीवन सुंदर गीत

आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेते प्रीत..
प्रेम तुझे लाभले, जाहले जीवन सुंदर गीत..

मधाळ वाणी काया गोरी
जणू अप्सरा उभी समोरी..
भान हरपले क्षणात, पाहुन
डोळ्यामधले भाव बिलोरी

एक कटाक्षामधेच झालो चारी मुंड्या चीत
प्रेम तुझे लाभले, जाहले जीवन सुंदर गीत.. II १ II

क्षणात खुलले जीवन माझे
रोम रोम मग झाले ताजे
सूर मिळाले पोकळ वेळुस
मधुर बासरी हृदयी वाजे

फिक्या फिक्या या आयुष्याला केले तू रंगीत
प्रेम तुझे लाभले, जाहले जीवन सुंदर गीत.. II २ II

वैभव फाटक ( ७ सप्टेंबर २०१२)

Thursday, 2 August 2012

वेदनांचा गाव माझा


मी जरी असलो स्वत:चा
ना मलाही ठाव माझा
मी जिथे रमतो सदा तो
वेदनांचा गाव माझा

दु:ख होते दु:ख आहे
ना कधी पर्वा तयाची
हाल माझे पाहिल्यावर
ना गरज सांगावयाची
फुंकरेने जाणिवांच्या
वाळलेला घाव माझा
मी जिथे रमतो सदा तो
वेदनांचा गाव माझा

जीवनाशी झुंजताना
खेळतो मी खेळ काही
देह हा मुर्दाडलेला
जिंकण्याची आस नाही
सावरायाही जमेना
उधळलेला डाव माझा
मी जिथे रमतो सदा तो
वेदनांचा गाव माझा

वैभव फाटक ( २-८-१२)

Sunday, 8 July 2012

साद वेडी

तुझ्या पावलांचा जिथे स्पर्श व्हावा
तिथे मी फुलांचा सडा अंथरावा
तुझ्या चाहुलींनी असा मुग्ध होतो
जसा जीव वेडा कुणी मंतरावा

तुझ्या पैंजणांचा जरा नाद व्हावा
उरातुन सुखाचा झरा पाझरावा
तुझे हासणे गोड गाली पहावे
सुखाने जिवाचा दिवा मालवावा

तुझा भास होतो परी साथ नाही
तुझ्या दर्शना मी दिवास्वप्न पाही
उरातील वादळ कसे हे शमावे
मनी बावऱ्या चैन नाही जराही

जिथे वाट नेते तिथे चालतो मी
उरी आठवांचे सडे झेलतो मी
तुझी भेट होणे अता शक्य नाही
तरी साद वेडी तुला घालतो मी

वैभव फाटक ( ०५-०७-२०१२)

Friday, 30 March 2012

घे विसावा जरा

'लिहा ओळीवर कविता - भाग ८९' या उपक्रमातील माझा सहभाग

घे विसावा जरा

सूर्य माथ्यावरी तापलेली धरा
राबसी तू किती घे विसावा जरा

स्वप्न साकारण्या तू किती झुंजला
क्रंदने झेलूनी रंजला गांजला..
देव ना ऐकतो कापऱ्या त्या सुरा
राबसी तू किती घे विसावा जरा

चार दमड्या मिळाया तुझी धाव ही
सोसले तू घणाचे किती घाव ही
हाकसी या रथा बडवुनी तू उरा
राबसी तू किती घे विसावा जरा

आज कन्या तुझी सासुरा चालली
फेडण्या कर्ज तू कातडी सोलली
प्राक्तनी आटलेला सुखाचा झरा
राबसी तू किती घे विसावा जरा

---------- वैभव फाटक -----------

Tuesday, 28 February 2012

एकटा

पाहिले तुज ज्या क्षणाला, मी न माझा राहिलो..
स्वत्व बसलो हरपुनी, रंगात तुझिया नाहलो....

स्वप्नी दिसे दिवसाही तू, वाटे कशा रजनी हवी..
रोजचा हा मार्ग माझा, घेई मग वळणे नवी....

छेडिल्या तारा दिलाच्या, तुजपुढे एके दिनी..
बोलली तू सत्वरी मज, कोणी दुजा या मनी....

काळजात चर्र झाले, वाटले आभास हा..
पुष्प गेले दूर देऊन, अंतरीचा वास हा....

जाहली वेडी अवस्था, रुचली न वरुणास ही..
वाटे चपला कोसळावी, सज्ज मी मरणास ही....

अश्रू माझे ओघळूनी, गाती दु:खा गाणी ते..
दुनियेला ही वाटले मग, पावसाचे पाणी ते....

एकटा मी चालतो मग, सावली ही संग नसे..
पौर्णिमेची आस धरुनी, किर्र काळोखी फसे....

जगणे असे तुजवाचुनी हे, अर्थ ना त्याला मुळी..
धाडिले तू देही या, जितेपणी चढण्या सुळी....

--------- वैभव फाटक  -------

Wednesday, 15 February 2012

याला जीवन ऐसे नाव..

कुणीतरी म्हणालं मला, आता नकोसं झालंय जिणं..
चौऱ्याऐंशी लक्ष जन्मानंतर, मिळे मनुष्य जन्माचं लेणं....

मानव जन्म सर्वश्रेष्ठ, नाहीतर डुकरे ही जगतात..
काय भले अन काय बुरे, हे अनुभवातून शिकतात....

करी गर्जना वाघाची, पण कुंपणापर्यंतच धाव..
घागर भरून वाहिली, तरी सुटेना याची हाव....

घोडा जाई अडीच घरे, परी प्यादं एकच घर चाले..
भाली लिहिले असेल तितुकेच, विधाता झोळीत घाले....

सुख दु:खाचा लपंडाव हा, जीव होतो बेजार..
झोळी काल ही भरलेली, आज छिद्रे ज्यास हजार....

प्रात:काली उगवलेला, रवी संध्येला मावळतो..
घटिका येताच यमदेवाचा, दोर मानवा आवळतो....

आयुष्य गेले उटारेटी, भांडण तंटे अन रगामध्ये..
मृत्यू समीप येऊन ठाकता, जीव हा गुंते जगामध्ये....

म्हणूनच म्हणतो मित्रांनो.....

वाढले असेल जे पुढ्यात, त्यावर खुशाल मारा ताव..
क्षणभंगुर हा खेळ तयाला, जीवन ऐसे नाव....

---------- वैभव फाटक ----------(२१/०७/२०११)

Thursday, 19 January 2012

साथ


ठरल्या ठिकाणी ती आज त्याला, भेटायला आली..
त्याचा अजून पत्ता नाही बघून, थोडीसी रागावली....

उशीर त्याच्या पाचवीलाच पुजलेला, त्याला आजचा दिवस ही नव्हता अपवाद..
मग त्यानेच हळूच 'Hi ' म्हणून, सुरु केला फॉर्मल संवाद....

लटका राग तिच्या गालावर, स्पष्ट दिसत होता..
तो मात्र तिची समजूत काढायला, कंबर कसत होता....

शेवटी त्याने कान पकडले, आणि मागितली जाहीर माफी..
ती खुदकन गालात हसली, म्हणाली 'चल खाऊया कुल्फी'....

तो तिला म्हणाला, 'हसताना तू किती गोड दिसतेस'..
'असं वाटतं तुला पहातच रहावं, जेव्हा तू हसतेस'....

त्यावर लाजून ती म्हणाली, 'पुरे झाली आता स्तुती माझी'..
'का रे रोज उशीर करतोस ? मनी हुरहूर लागते न तुझी'....

बोलता बोलता तिच्या डोळ्यात, आसवांची गर्दी झाली..
तिच्या अंत:करणी साठलेल्या, दु:खाची जणू वर्दी आली....

तिचा हात हातात घेऊन, त्याने डोळ्यात तिच्या पाहिले..
म्हणाला 'वचन तुला देतो आजपासून, जीवन तुला वाहिले'....

ती ही आता गहिवरली, म्हणाली 'सोडू नकोस माझी कधीच साथ'..
'असाच राहू दे सदैव आपला, एकमेकांच्या हातात हात'....
'असाच राहू दे सदैव आपला, एकमेकांच्या हातात हात'....

---------------: वैभव फाटक (२०-०३-२०११) :----------------

तुझ्याच हाती धागा.

आषाढी एकादशी, साजरी होई आज. 
मूर्तीस सावळ्याच्या, वेगळाच साज..
पंढरीच्या देवालयी, विठ्ठल हा उभा.
पिवळ्या पितांबरे जणू , वाढे त्याची शोभा..

कर कटावरी, आणि साजिरे हे रूप.
भक्तजन ओवाळिती, पंचारती धूप..

विठ्ठल विठ्ठल घोषात, झाले वारकरी दंग.
भक्ती भावामध्ये गाती, तुक्याचे अभंग..

चंद्रभागेतीरी आज, सोहळा रंगला.
हरेक भाविक, हरिनामात गुंगला..

पंढरीच्या वारीमध्ये, परमोच्च सुख.
विठू राया दूर करी, सकळांचे दु:..

मी तर फक्त पतंग, देवा तुझ्याच हाती धागा.
मागणे हे एकच, मिळो तुझ्या चरणी जागा..

-----------वैभव फाटक (११-०७-२०११)---------

आषाढी एकादशीच्या या सुवर्ण मुहूर्तावर हे काव्य पांडुरंगा चरणी अर्पण.

विश्व दोघांच...

तो ऑफिस मधून घरी आला, तिला जोराने मारी हाका..
ती म्हणाली आतूनच, अहो जरा दम तरी टाका....

ते सारं सोड गं , चल तू  हो बघू  रेडी..
अहो कसं जमणार आत्ता मला, कामं राहिली आहेत  थोडी....

नकार तिचा येताच याच्या, चेहरयाला पडल्या आठ्या..
जेवणाची तयारी करायचीय मला, जाऊबाई येणार आहेत मोठ्या....

कधी नव्हे तो चांगला मूड होता, म्हटलं पिक्चर ला जाऊ..
ती म्हणे त्यात की एवढं, पुन्हा कधीतरी पाहू....

हिरमुसला चेहरा घेऊन तो, आतल्या खोलीत निघून गेला..
तिनेही नाईलाजाने मग, स्वयंपाकघरात  प्रवेश केला....

जेवणावर सुद्धा त्याचे, फारसे नव्हते लक्ष..
कधी राग जाणार याचा, प्रश्न होता यक्ष....

सगळा पसारा आवरताना तिला, झोपायला वाजले बारा..
तोपर्यंत मात्र उतरला होता, याच्या रागाच्या पारा....

तो समोर आली तसे, त्याने हात तिचा धरला..
म्हणे खरच गं तुझ्या कष्टापुढे, माझा 'मी' पणा हरला....

समईच्या वातीप्रमाणे तू, घरासाठी जळत गेलीस..
आख्या घराचं ओझं नेहमी, तळहातावर झेलीत आलीस....

तुला नाही कधी वाटलं, तुझं असं एक विश्व असावं..
त्यात स्वतःला झोकून देऊन, स्वप्नं रंगवत बसावं....

वेगळं नाही माझं विश्व, तुमच्या विश्वात मिळालं..
संसार थाटला तुमच्याशी, तेव्हाच मी तू  पण गळालं....

           ......   
वैभव फाटक ......