मराठी ब्लॉग विश्व

Friday 11 October 2013

दुरून जाता कधीतरी - ( तरही गझल).



दुरून जाता कधीतरी कुटीत माझ्या वळून जा
कवेत माझ्या अखेरचे भिजून तू विरघळून जा

सदैव आहेत सोबती उरातले घाव आजही
नकोच घालूस फुंकरी जमेल तर हळहळून जा

तुझ्यामुळे स्वप्न राहिले तिथेच वाळूत कोरडे
पुसून टाकायला तरी अखेरचा कोसळून जा

परिस्थितीने गळ्यामधे कधीच हा फास टाकला
यमा, मला सोडवायला हळूच तो आवळून जा

कितीक ओथंब दाटले मनात माझ्या अजूनही
निघून गेलीस जीवनी मनातुनी ओघळून जा

हरेक पानास शेवटी गळून आहे पडायचे
तुझ्यापरीने कधीतरी जरूर तू सळसळून जा

वैभव फाटक ( ११ ऑक्टोबर २०१३ )