पाहिले तुज ज्या क्षणाला, मी न माझा राहिलो..
स्वत्व बसलो हरपुनी, रंगात तुझिया नाहलो....
स्वप्नी दिसे दिवसाही तू, वाटे कशा रजनी हवी..
रोजचा हा मार्ग माझा, घेई मग वळणे नवी....
छेडिल्या तारा दिलाच्या, तुजपुढे एके दिनी..
बोलली तू सत्वरी मज, कोणी दुजा या मनी....
काळजात चर्र झाले, वाटले आभास हा..
पुष्प गेले दूर देऊन, अंतरीचा वास हा....
जाहली वेडी अवस्था, रुचली न वरुणास ही..
वाटे चपला कोसळावी, सज्ज मी मरणास ही....
अश्रू माझे ओघळूनी, गाती दु:खा गाणी ते..
दुनियेला ही वाटले मग, पावसाचे पाणी ते....
एकटा मी चालतो मग, सावली ही संग नसे..
पौर्णिमेची आस धरुनी, किर्र काळोखी फसे....
जगणे असे तुजवाचुनी हे, अर्थ ना त्याला मुळी..
धाडिले तू देही या, जितेपणी चढण्या सुळी....
--------- वैभव फाटक -------
No comments:
Post a Comment