मराठी ब्लॉग विश्व

Monday, 28 July 2014

गार्‍हाणी देवास घातली होती

गार्‍हाणी देवास घातली होती
देवाने समजूत काढली होती

स्वप्न गुलाबी पूर्ण पाहता आले
प्रभा उजाडायची थांबली होती

तेव्हाही होती रक्ताची नाती
फक्त त्यातली दरी वाढली होती

मागमूस नाही जेथे छायेचा
अशा दिशेने उन्हे चालली होती

तिची कहाणी तशी पाहता मोठी
पण काही अश्रूत मावली होती 

पळून गेली जरी थोरली कन्या
फळे धाकटीनेच भोगली होती

वैभव फाटक ( २८ जुलै २०१४)

Tuesday, 8 July 2014

विस्कटलेल्या जिवास या ती बघत असावी

विस्कटलेल्या जिवास या ती बघत असावी
म्हणून माझी जखम अता साकळत असावी

दुनियेवर का उगाच लांछन मलीनतेचे ?
आजकालची विचारसरणी मळत असावी

हाता-तोंडाशी आलेला पैसा जातो
अर्ध्या रस्त्यातून लक्ष्मी वळत असावी

कष्ट सोसल्याचे फळ प्रत्येकाला मिळते
म्हणून बहुधा साय दुधावर धरत असावी

केव्हाचा कोसळतो आहे पाउस येथे
अजूनही वेदना धरेची जळत असावी

दुर्देवी हे झाड किती आक्रंदत आहे !
वेल तोडली गेलेली कळवळत असावी

वैभव फाटक  ( ८ जुलै २०१४)