मराठी ब्लॉग विश्व

Sunday, 8 April 2012

आजही

तू फुलात तू कळ्यांत तू दवात आजही
तू धरेत अंतरात तू नभात आजही

साद घालतो तुला सये जरा निघून ये
संगती न तू कधी परी मनात आजही

रोज गोड स्वप्न पाहतो तुझ्याच दर्शना
रोजचा उशीर थांबली प्रभात आजही

आर्त दाह जाळतो उरास आठवांसवे
धाडशील पावसास मी उन्हात आजही


एकदा तरी पहा गवाक्ष खोलुनी जरा
वादळे किती विसावली उरात आजही

----- वैभव फाटक ( ८-४-२०१२ ) -----

No comments:

Post a Comment