मराठी ब्लॉग विश्व

Saturday, 4 July 2015

पाहिली काल आग डोळ्यांनी

पाहिली काल आग डोळ्यांनी
स्वप्न केले महाग डोळ्यांनी

संपली बोलण्यातली ताकद
तू अता हक्क माग डोळ्यांनी

गुंगले मैफिलीत सारेजण
गायला मी 'बिहाग' डोळ्यांनी

लागले जर मनास या चटके
दिसत नाहीत डाग डोळ्यांनी

सांगते नार या समाजाला
थांबवा पाठलाग डोळ्यांनी

वैभव फाटक 

Friday, 3 April 2015

रोज होतोच वाद एखादा

रोज होतोच वाद एखादा
रोज होतोच बाद एखादा

साथ तू सोडलीस माझी पण
घालतो रोज साद एखादा

घालणारे किती इथे पूजा
वाटणारा प्रसाद एखादा

जीवनाला कलाटणी देतो
देत उत्स्फूर्त दाद एखादा

माफ केली तुझी किती पापे
सोड माझा प्रमाद एखादा

वैभव फाटक

Thursday, 8 January 2015

होय श्रद्धा महागली आहे

भेटवस्तूत तोलली आहे
होय, श्रद्धा महागली आहे

ठेव विश्वास आज त्याच्यावर
आज हातात बाटली आहे

गुंफ शेरास तू शिताफीने
तोकडी ही लगावली आहे

तू तिथे गाळलेस अश्रू अन
वीज येथे कडाडली आहे

आजवर जी पहातही नव्हती
आज ती चक्क लाजली आहे

वैभव फाटक, वापी ( ०७-०१-२०१५)

Monday, 28 July 2014

गार्‍हाणी देवास घातली होती

गार्‍हाणी देवास घातली होती
देवाने समजूत काढली होती

स्वप्न गुलाबी पूर्ण पाहता आले
प्रभा उजाडायची थांबली होती

तेव्हाही होती रक्ताची नाती
फक्त त्यातली दरी वाढली होती

मागमूस नाही जेथे छायेचा
अशा दिशेने उन्हे चालली होती

तिची कहाणी तशी पाहता मोठी
पण काही अश्रूत मावली होती 

पळून गेली जरी थोरली कन्या
फळे धाकटीनेच भोगली होती

वैभव फाटक ( २८ जुलै २०१४)

Tuesday, 8 July 2014

विस्कटलेल्या जिवास या ती बघत असावी

विस्कटलेल्या जिवास या ती बघत असावी
म्हणून माझी जखम अता साकळत असावी

दुनियेवर का उगाच लांछन मलीनतेचे ?
आजकालची विचारसरणी मळत असावी

हाता-तोंडाशी आलेला पैसा जातो
अर्ध्या रस्त्यातून लक्ष्मी वळत असावी

कष्ट सोसल्याचे फळ प्रत्येकाला मिळते
म्हणून बहुधा साय दुधावर धरत असावी

केव्हाचा कोसळतो आहे पाउस येथे
अजूनही वेदना धरेची जळत असावी

दुर्देवी हे झाड किती आक्रंदत आहे !
वेल तोडली गेलेली कळवळत असावी

वैभव फाटक  ( ८ जुलै २०१४)

Monday, 30 December 2013

जे हवे ते घडायचे नाही


जे हवे ते घडायचे नाही
एक नक्की, खचायचे नाही

शोध घे वेगळ्याच वाटेवर
सुख इथे सापडायचे नाही

मिसळणे तू जपून ठरवावे
जर तुला विरघळायचे नाही

कर लबाडी खुशाल जगताना
पण कधी सापडायचे नाही

शेवटी तीच जिंकते बाजी
भांडणे परवडायचे नाही

तू नको अवतरूस भगवंता
सूत अपुले जुळायचे नाही

धाक आहे जबाबदाऱ्यांचा
दु:ख माझे झरायचे नाही

वैभव फाटक ( ३१ डिसेंबर २०१३)

Monday, 18 November 2013

करणे जमले नाही

मी प्रयत्न कितिदा केला पण करणे जमले नाही.
तत्वांवर खोटा बुरखा पांघरणे जमले नाही.
तोऱ्यात अशा वावरतो की मीच जगाचा राजा
वास्तवात नाचत नाही कोणी तालावर माझ्या

मी प्रेम कराया गेलो तेथेही पुरता फसलो
ना दोष कुणाला देता मी नशिबावरती हसलो
मी किती उन्हे पत्करली जखमांच्या भरण्यासाठी
सर येते आठवणींची त्या ओल्या करण्यासाठी

वाऱ्याने अलगद उडते त्या पानागत मी आहे
धागा तुटलेला ज्याचा तो पतंग जणु मी वाहे
पापण्यात माझ्या भरले दु:खाचे हळवे मोती
ते येण्यासाठी कारण ही फसवी नाती -गोती

वैभव फाटक ( १८ नोव्हेंबर २०१३ )