मराठी ब्लॉग विश्व

Wednesday, 27 March 2013

तुला प्रत्येकदा सांभाळले गेले

तुला प्रत्येकदा सांभाळले गेले
चुका माझ्याच होत्या मानले गेले

कुठेसा सांडला शेंदूर थोडासा
पुढे देऊळ तेथे बांधले गेले

जराशी घेतली बाजू तुझी मी अन
तुझ्याशी नाव माझे जोडले गेले

तसा लाचार तो नव्हताच आताही
भुकेने पाय त्याचे ओढले गेले

नवी मी जोडली नाती कशासाठी ?
पुराणे पाश त्याने तोडले गेले.

वैभव फाटक ( २७ मार्च २०१३)

Thursday, 14 March 2013

डावपेच

काळ देतो पुन्हा पुन्हा ग्वाही
की कशाचीच शाश्वती नाही

मी न माझा मलाच सापडलो
पालथ्या घातल्या दिशा दाही

हाल पाहून विश्व हळहळले
वाटले फक्त ना तिला काही

प्रेम डोळ्यातले खरे आहे ?
की जुना डावपेच आताही

सुख नको धन नकोच समृद्धी
मोकळे श्वास दे मला काही

वैभव फाटक ( १४-०३-२०१३)

Friday, 1 March 2013

जाता जाता....

धीर सोडुनी  नकोस हारू जाता जाता..
स्वप्नाला सत्यात चितारू जाता जाता....

किती वादळे घेरून आली अवती भवती..
कलंडणारी नौका तारू जाता जाता....

तेल तूप नेताना नेले धुपाटणे ही..
दैवाला या जाब विचारू जाता जाता....

जगा कळू दे लाख सोसले जीवनभर मी..
आता संकट नको निवारू जाता जाता....

लोचनास मी छळता थोडे आक्रंदाने..
अश्रू वदले "संप पुकारू" जाता जाता....

वैभव फाटक

Tuesday, 12 February 2013

नक्की


स्पंदन माझे उरी तुझ्या धडधडेल नक्की
माघारी पाऊल तुझे मग वळेल नक्की

झुगारून जर दिल्या मनाने समाज सीमा
लाख ठेव पिंजऱ्यात, पक्षी उडेल नक्की

भले घाव दे दु:खाचे जीवनात मजला
एक दिलासा जगण्यासाठी पुरेल नक्की

मिसळलेस जर आयुष्याच्या सर्व क्षणांना
सुखात हसऱ्या, दु:ख तुझे विरघळेल नक्की

मरण्यापूर्वी काम असे तू करून जा की,
मेल्यानंतर अवघे जग हळहळेल नक्की

वैभव फाटक (१२-०२-२०१३)

Sunday, 2 December 2012

भगवंता


शरण आलो तुला, पण संपला ना त्रास भगवंता
तुझ्या असण्यावरी ठेवू कसा विश्वास भगवंता ?

प्रपंचातून जर आहे दिला मी वेळ भक्तीला
कशाला सांग मी घेऊ उगा संन्यास भगवंता ?

नको छेडूस प्रश्नाला "पुरे की आणखी देऊ ?"
मनुष्याने कधी म्हटलेच नाही 'बास' भगवंता

कधी कळणार लोकांना, कसे जिंकायचे तुजला ?
मनी अंधार वसला अन घरी आरास भगवंता

जगाची सर्व दु:खे दूर करणे शक्य का नाही ?
कदाचित तोकडे पडले तुझे सायास भगवंता

वैभव फाटक ( ३ डिसेंबर २०१२)

Wednesday, 24 October 2012

कहाणी

कंठ आहे दाटलेला, मूक वाणी
वाच माझ्या लोचनांमधली कहाणी

साफ केला काळजाचा कोपरा मी
आठवांची जळमटे होती पुराणी

टाकले  होतेस  तू  पाऊल  जेथे
आजही फुलतात बागा त्या ठिकाणी

हक्क माझा राहिला नाही स्वतःवर
ही तुझ्या प्रेमात पडल्याची निशाणी

यायची दु:खा, पुन्हा घाई कशाला
आजही आहे जुने, डोळ्यात पाणी

वैभव फाटक ( २४ ऑक्टोबर २०१२)

Sunday, 7 October 2012

जाहले जीवन सुंदर गीत

आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेते प्रीत..
प्रेम तुझे लाभले, जाहले जीवन सुंदर गीत..

मधाळ वाणी काया गोरी
जणू अप्सरा उभी समोरी..
भान हरपले क्षणात, पाहुन
डोळ्यामधले भाव बिलोरी

एक कटाक्षामधेच झालो चारी मुंड्या चीत
प्रेम तुझे लाभले, जाहले जीवन सुंदर गीत.. II १ II

क्षणात खुलले जीवन माझे
रोम रोम मग झाले ताजे
सूर मिळाले पोकळ वेळुस
मधुर बासरी हृदयी वाजे

फिक्या फिक्या या आयुष्याला केले तू रंगीत
प्रेम तुझे लाभले, जाहले जीवन सुंदर गीत.. II २ II

वैभव फाटक ( ७ सप्टेंबर २०१२)