मराठी ब्लॉग विश्व

Saturday, 4 July 2015

पाहिली काल आग डोळ्यांनी

पाहिली काल आग डोळ्यांनी
स्वप्न केले महाग डोळ्यांनी

संपली बोलण्यातली ताकद
तू अता हक्क माग डोळ्यांनी

गुंगले मैफिलीत सारेजण
गायला मी 'बिहाग' डोळ्यांनी

लागले जर मनास या चटके
दिसत नाहीत डाग डोळ्यांनी

सांगते नार या समाजाला
थांबवा पाठलाग डोळ्यांनी

वैभव फाटक 

Friday, 3 April 2015

रोज होतोच वाद एखादा

रोज होतोच वाद एखादा
रोज होतोच बाद एखादा

साथ तू सोडलीस माझी पण
घालतो रोज साद एखादा

घालणारे किती इथे पूजा
वाटणारा प्रसाद एखादा

जीवनाला कलाटणी देतो
देत उत्स्फूर्त दाद एखादा

माफ केली तुझी किती पापे
सोड माझा प्रमाद एखादा

वैभव फाटक

Thursday, 8 January 2015

होय श्रद्धा महागली आहे

भेटवस्तूत तोलली आहे
होय, श्रद्धा महागली आहे

ठेव विश्वास आज त्याच्यावर
आज हातात बाटली आहे

गुंफ शेरास तू शिताफीने
तोकडी ही लगावली आहे

तू तिथे गाळलेस अश्रू अन
वीज येथे कडाडली आहे

आजवर जी पहातही नव्हती
आज ती चक्क लाजली आहे

वैभव फाटक, वापी ( ०७-०१-२०१५)