स्पंदन माझे उरी तुझ्या धडधडेल नक्की
माघारी पाऊल तुझे मग वळेल नक्की
झुगारून जर दिल्या मनाने समाज सीमा
लाख ठेव पिंजऱ्यात, पक्षी उडेल नक्की
भले घाव दे दु:खाचे जीवनात मजला
एक दिलासा जगण्यासाठी पुरेल नक्की
मिसळलेस जर आयुष्याच्या सर्व क्षणांना
सुखात हसऱ्या, दु:ख तुझे विरघळेल नक्की
मरण्यापूर्वी काम असे तू करून जा की,
मेल्यानंतर अवघे जग हळहळेल नक्की
वैभव फाटक (१२-०२-२०१३)