जे हवे ते घडायचे नाही
एक नक्की, खचायचे नाही
शोध घे वेगळ्याच वाटेवर
सुख इथे सापडायचे नाही
मिसळणे तू जपून ठरवावे
जर तुला विरघळायचे नाही
कर लबाडी खुशाल जगताना
पण कधी सापडायचे नाही
शेवटी तीच जिंकते बाजी
भांडणे परवडायचे नाही
तू नको अवतरूस भगवंता
सूत अपुले जुळायचे नाही
धाक आहे जबाबदाऱ्यांचा
दु:ख माझे झरायचे नाही
वैभव फाटक ( ३१ डिसेंबर २०१३)