मराठी ब्लॉग विश्व

Monday, 30 July 2012

पावले

आली तुझ्या मागावरी चालून माझी पावले
रक्ताळली, पण चालली हासून माझी पावले

आश्चर्य याचे वाटले, सीमा कशी ओलांडली ?
प्रत्येकदा मी टाकली, मोजून माझी पावले

मी शोधला रस्ता नवा, नेईल जो विजयाकडे
नंतर किती गेले तिथे, पाहून माझी पावले

फासे पलटले प्राक्तनी, लाथाडले ज्यांनी कधी
मागे पुढे घोटाळले, वंदून माझी पावले

जादूभरी ताकद तिच्या होती मृदू शब्दांमधे
कित्येकदा आलो पुन्हा वळवून माझी पावले

बांधील होती आजवर, आला तुझा होकार अन..
सरसावली बेड्या जुन्या तोडून माझी पावले

-------  वैभव फाटक ( २६ जुलै २०१२) -------

Wednesday, 18 July 2012

प्रश्न काही

हासणाऱ्या चेहऱ्याच्या आड होते प्रश्न काही
उत्तरे शोधूनही, ओसाड होते  प्रश्न काही

चार चौघातून फिरता, ना कधी वाट्यास गेले
एकट्याला घेरणारे, भ्याड होते प्रश्न काही

लपवलेले मी जरा दु:खास माझ्या, पाहिल्यावर
प्राक्तनाने टाकलेली, धाड होते प्रश्न काही

उत्तरे माझ्याकडे नाहीत हे ठाउक तरीही
येउनी भंडावणारे, द्वाड होते प्रश्न काही

अनुभवाला लावले मी समजण्यासाठी पणाला
सर्व पाने गूढ ऐसे, बाड होते प्रश्न काही

----- ( वैभव फाटक - १८ जुलै २०१२ ) -----

Sunday, 8 July 2012

साद वेडी

तुझ्या पावलांचा जिथे स्पर्श व्हावा
तिथे मी फुलांचा सडा अंथरावा
तुझ्या चाहुलींनी असा मुग्ध होतो
जसा जीव वेडा कुणी मंतरावा

तुझ्या पैंजणांचा जरा नाद व्हावा
उरातुन सुखाचा झरा पाझरावा
तुझे हासणे गोड गाली पहावे
सुखाने जिवाचा दिवा मालवावा

तुझा भास होतो परी साथ नाही
तुझ्या दर्शना मी दिवास्वप्न पाही
उरातील वादळ कसे हे शमावे
मनी बावऱ्या चैन नाही जराही

जिथे वाट नेते तिथे चालतो मी
उरी आठवांचे सडे झेलतो मी
तुझी भेट होणे अता शक्य नाही
तरी साद वेडी तुला घालतो मी

वैभव फाटक ( ०५-०७-२०१२)