मराठी ब्लॉग विश्व

Saturday, 12 May 2012

काल पुन्हा

काळजातल्या विझलेल्या ज्वाळा धगधगल्या काल पुन्हा
हसता हसता  क्षणात झाले  रडून ओले  गाल पुन्हा

मनी ठरवतो 'विचार आता पक्का झाला कायमचा'
क्षणात येते अन चुकचुकते का शंकेची पाल पुन्हा ?

माणूस आणिक श्वान सारखे, वाटे 'तुम्हास' पाहुनिया
आज बदडले तरी उद्याला शेपुट हलवत याल पुन्हा !

गेल्या वर्षापासुन होता 'कर्तव्याचा' बेत मनी
पण पोहे खाण्यातच गेले निघून अख्खे साल पुन्हा

तुझ्यासंगती आळवले मी जीवनगाणे प्रेमाचे
तू गेल्यावर चुकले सारे आयुष्याचे ताल पुन्हा

भालावरची रेष सुखाची बहुधा पुसली गेलेली
एक विनंती तुला, "लिहावे, देवा माझे भाल पुन्हा"

--------- वैभव फाटक ( १२ मे २०१२) ----------

Saturday, 5 May 2012

'ती' बात नाही

सूर पक्का लागला जर ज्ञात नाही
का म्हणावे बेसुरा मी गात नाही ?

साबुदाणा चापला अन वर म्हणालो
"आज तर 'एकादशी', मी खात नाही"

चाललो मी, जर तुला झालो नकोसा
त्याग हा तर, तू दिलेली मात नाही

भ्रष्ट नेता पाहुनी जनता म्हणाली
" 'कमळ' परवडले परंतू 'हात' नाही"

काय तुलना जीव जडल्या झोपडीची ?
भव्य प्रासादातही 'ती' बात नाही

वास्तवाशी आज नाते जोडले मी
कल्पनाविश्वात आता न्हात नाही

चंद्रम्याला एकदा ना धाडते पण,
धाडला ना 'दिवस' ऐसी रात नाही

----- वैभव फाटक ( ५ मे २०१२) -----