मराठी ब्लॉग विश्व

Tuesday 28 February 2012

एकटा

पाहिले तुज ज्या क्षणाला, मी न माझा राहिलो..
स्वत्व बसलो हरपुनी, रंगात तुझिया नाहलो....

स्वप्नी दिसे दिवसाही तू, वाटे कशा रजनी हवी..
रोजचा हा मार्ग माझा, घेई मग वळणे नवी....

छेडिल्या तारा दिलाच्या, तुजपुढे एके दिनी..
बोलली तू सत्वरी मज, कोणी दुजा या मनी....

काळजात चर्र झाले, वाटले आभास हा..
पुष्प गेले दूर देऊन, अंतरीचा वास हा....

जाहली वेडी अवस्था, रुचली न वरुणास ही..
वाटे चपला कोसळावी, सज्ज मी मरणास ही....

अश्रू माझे ओघळूनी, गाती दु:खा गाणी ते..
दुनियेला ही वाटले मग, पावसाचे पाणी ते....

एकटा मी चालतो मग, सावली ही संग नसे..
पौर्णिमेची आस धरुनी, किर्र काळोखी फसे....

जगणे असे तुजवाचुनी हे, अर्थ ना त्याला मुळी..
धाडिले तू देही या, जितेपणी चढण्या सुळी....

--------- वैभव फाटक  -------

Sunday 26 February 2012

रंक आता राव झाले

जीत होता नाव झाले
रंक आता राव झाले

कोंबड्याची बांग नाही
आज जागे गाव झाले

जिंकताना हारलो मी
व्यर्थ सारे डाव झाले

आठवांना चाळताना
झोंबणारे घाव झाले

वेध घेण्या काळजाचा
लाजण्याचे आव झाले

चार नोटा वाटता मी
भुंकणारे म्याव झाले

वैभव फाटक ( २६-०२-२०१२)

Sunday 19 February 2012

प्राक्तन


वेढले या संकटांनी घोर आता
कापलेले प्राक्तनाचे दोर आता

'घे भरारी' सांगते दुनिया मलाही
संपला पंखातला या जोर आता

टाकुनी रस्त्यात निघुनी बाप गेला
पाप त्याचे भोगते हे पोर आता

चोरता तू भाग्य माझे खंगलो मी
क्रंदने वेचून थोडी चोर आता

पावसाची साद आली 'येत आहे'
नाच करण्या 'ना' म्हणाला मोर आता

पाहुनी कांती तुझ्या गोऱ्या कपोली
रुक्षली ती चंद्रम्याची कोर आता

वैभव फाटक ( २०-०२-२०१२ - वापी )

Wednesday 15 February 2012

याला जीवन ऐसे नाव..

कुणीतरी म्हणालं मला, आता नकोसं झालंय जिणं..
चौऱ्याऐंशी लक्ष जन्मानंतर, मिळे मनुष्य जन्माचं लेणं....

मानव जन्म सर्वश्रेष्ठ, नाहीतर डुकरे ही जगतात..
काय भले अन काय बुरे, हे अनुभवातून शिकतात....

करी गर्जना वाघाची, पण कुंपणापर्यंतच धाव..
घागर भरून वाहिली, तरी सुटेना याची हाव....

घोडा जाई अडीच घरे, परी प्यादं एकच घर चाले..
भाली लिहिले असेल तितुकेच, विधाता झोळीत घाले....

सुख दु:खाचा लपंडाव हा, जीव होतो बेजार..
झोळी काल ही भरलेली, आज छिद्रे ज्यास हजार....

प्रात:काली उगवलेला, रवी संध्येला मावळतो..
घटिका येताच यमदेवाचा, दोर मानवा आवळतो....

आयुष्य गेले उटारेटी, भांडण तंटे अन रगामध्ये..
मृत्यू समीप येऊन ठाकता, जीव हा गुंते जगामध्ये....

म्हणूनच म्हणतो मित्रांनो.....

वाढले असेल जे पुढ्यात, त्यावर खुशाल मारा ताव..
क्षणभंगुर हा खेळ तयाला, जीवन ऐसे नाव....

---------- वैभव फाटक ----------(२१/०७/२०११)

Saturday 11 February 2012

वाटसरू

(मराठी कविता समूहाच्या 'अशी जगावी गझल' उपक्रमातील माझा दुसरा प्रयत्न.)

वाटसरू

ब्रह्म पाहिले  ह्याची डोळा रंग  महाली जाता जाता
लाजलीस तू घोर रक्तिमा खुलला गाली जाता जाता

माळलीस तू वेणी केशी गंध दरवळे दिशा दिशांना
स्वप्ने माझी सुगंधात त्या क्षणात न्हाली जाता जाता

नियतीने मज पुकार देता अंधारातच खेळ मांडला
दैवहीन मी हार तारण्या चलतो चाली जाता जाता

किती घेतल्या ताना मुरक्या आळविण्या  मी 'मारुबिहाग'
चपखल जेव्हा सूर लागले पहाट झाली जाता जाता

वाटसरू मी शोधित फिरतो अंधारातून वाट यशाची
सोबतीस तू यावे घेउन लाख मशाली जाता जाता

वैभव फाटक

( 'मारुबिहाग' हा एक फक्त रात्री गायला जाणारा एक राग आहे)

Monday 6 February 2012

स्वप्न....


हासणे खोटे फुकाचे.....आज येथे टाळतो..
पापण्यांना भार होता.....आसवे मी गाळतो....

संपते ती लांबलेली.....भेट प्रेमाची जरी..
जीवघेण्या त्या कटाक्षा.....पाहुनी रेंगाळतो....

लाख डोळे पाहती.....त्यांना कसा मी आवरू.. ?
या तुझ्या फोटोस आता.....दृष्ट मी ओवाळतो....

जाहले जाणे तुझे.....आयुष्य हे भासे रिते ..
गांजलेल्या या व्यथेने.....स्वप्न माझे जाळतो....

प्रेमरंगी रंगताना.....आणभाका घेतल्या..
विस्मरोनी मुक्त तू.....मी शब्द माझा पाळतो....

मी तयारी दाखवावी.....दैव का नाही म्हणे..?
वाटते नेण्या मला.....मृत्यूच हा ओशाळतो....

--------------- वैभव फाटक --------------