मराठी ब्लॉग विश्व

Wednesday 18 April 2012

पिता अभागी करी चाकरी

पिता अभागी करी चाकरी
शिकून सवरून पोरगा घरी

जोडू म्हणतो नवीन नाती
जुन्यात आता वाढली दरी

तरणेताठे पोर हरपले
बाप खंगला माय हंबरी

सांगायाला एकच छप्पर
स्वतंत्र मागे लेक ओसरी

सुधबुध हरली राधा गवळण
कान्हा छेडू नको बासरी

वरून दिसतो मनोर, आतुन
पोखरलेल्या मृत्तिकेपरी

कशास चिंता करा मतांची
घराघरातुन वाट चादरी

वैभव फाटक ( १४-०४-२०१२)

Wednesday 11 April 2012

इथे ग्रीष्म ज्वाळा

इथे ग्रीष्म ज्वाळा......तिथे गार वारा..
प्रिये धाड तू...आज...पर्जन्य गारा....

दिले फेकुनी मी......तुझ्या आठवांना..
तरी चक्षु पाही......तुझा खेळ सारा....

धरा आज चंद्रा......बघाया निघाली..
नभी तारकांचा......कशाला पहारा....

उगी नाव तेव्हा......जली हाकली मी..
कुठे लोचनांसी......दिसे ना किनारा....

घरी फौज मोठी......जिथे लेकरांची..
तिथे 'सिर्फ दो' चा......कशा पाइ नारा ?....

झिजोनी रचीले......निवासास ज्याने..
अभागी पित्याला......तिथे नाही थारा..

जरी बंगले...बांधिले...तू हजारो..
तुला शेवटी...लाकडांचा...सहारा....

----- वैभव फाटक ------
मूळ रचना --- १०-१२-२०११
सुधारणा --- ११-०४-२०१२

Sunday 8 April 2012

आजही

तू फुलात तू कळ्यांत तू दवात आजही
तू धरेत अंतरात तू नभात आजही

साद घालतो तुला सये जरा निघून ये
संगती न तू कधी परी मनात आजही

रोज गोड स्वप्न पाहतो तुझ्याच दर्शना
रोजचा उशीर थांबली प्रभात आजही

आर्त दाह जाळतो उरास आठवांसवे
धाडशील पावसास मी उन्हात आजही


एकदा तरी पहा गवाक्ष खोलुनी जरा
वादळे किती विसावली उरात आजही

----- वैभव फाटक ( ८-४-२०१२ ) -----

Sunday 1 April 2012

तू शांत कसा ?

स्वप्ने तुटली सारी....तू शांत कसा ?
अपयश आले दारी....तू शांत कसा ?

न्याय मागुनी आता.... तळवे झिजले
अजून चाले वारी....तू शांत कसा ?

जिथे पोचण्या नुसता....तू गडबडला
तिथे जिंकली नारी....तू शांत कसा ?

किती धुमसला रडला....अन्याय गिळुन
नयने झाली खारी....तू शांत कसा ?

जिच्याच साठी लढला....तू जगताशी
तिने तोडली यारी....तू शांत कसा ?

तुला समजते 'मजनू'.... बहुधा दुनिया
जो तो पत्थर मारी....तू शांत कसा ?

--- ( वैभव फाटक - ३१ मार्च २०१२) ---