मराठी ब्लॉग विश्व

Friday 30 March 2012

घे विसावा जरा

'लिहा ओळीवर कविता - भाग ८९' या उपक्रमातील माझा सहभाग

घे विसावा जरा

सूर्य माथ्यावरी तापलेली धरा
राबसी तू किती घे विसावा जरा

स्वप्न साकारण्या तू किती झुंजला
क्रंदने झेलूनी रंजला गांजला..
देव ना ऐकतो कापऱ्या त्या सुरा
राबसी तू किती घे विसावा जरा

चार दमड्या मिळाया तुझी धाव ही
सोसले तू घणाचे किती घाव ही
हाकसी या रथा बडवुनी तू उरा
राबसी तू किती घे विसावा जरा

आज कन्या तुझी सासुरा चालली
फेडण्या कर्ज तू कातडी सोलली
प्राक्तनी आटलेला सुखाचा झरा
राबसी तू किती घे विसावा जरा

---------- वैभव फाटक -----------

Wednesday 14 March 2012

उमाळे

कुणाचे घेतले होते कुणाला वाटले होते
फुकाचा 'हा' मिळवण्याला बुटांना चाटले होते

पतंगासारखी घेउन भरारी आज भरकटलो
तयांनी वाकुल्या केल्या जयांना छाटले होते

जरी वदलीस रागाने "इथेची संपले सारे"
तुझ्या डोळ्यात अश्रूंचे उमाळे दाटले होते

उघडले जीवनाच्या पुस्तकाला चाळली पाने
जिथे येणे तुझे ते पर्ण आता फाटले होते

निखळले आज माझे स्वप्न चक्काचूर होऊनी
रडाया लागता घन आसवांचे आटले होते

------------------- वैभव फाटक --------------------