मराठी ब्लॉग विश्व

Tuesday, 12 February 2013

नक्की


स्पंदन माझे उरी तुझ्या धडधडेल नक्की
माघारी पाऊल तुझे मग वळेल नक्की

झुगारून जर दिल्या मनाने समाज सीमा
लाख ठेव पिंजऱ्यात, पक्षी उडेल नक्की

भले घाव दे दु:खाचे जीवनात मजला
एक दिलासा जगण्यासाठी पुरेल नक्की

मिसळलेस जर आयुष्याच्या सर्व क्षणांना
सुखात हसऱ्या, दु:ख तुझे विरघळेल नक्की

मरण्यापूर्वी काम असे तू करून जा की,
मेल्यानंतर अवघे जग हळहळेल नक्की

वैभव फाटक (१२-०२-२०१३)

Sunday, 2 December 2012

भगवंता


शरण आलो तुला, पण संपला ना त्रास भगवंता
तुझ्या असण्यावरी ठेवू कसा विश्वास भगवंता ?

प्रपंचातून जर आहे दिला मी वेळ भक्तीला
कशाला सांग मी घेऊ उगा संन्यास भगवंता ?

नको छेडूस प्रश्नाला "पुरे की आणखी देऊ ?"
मनुष्याने कधी म्हटलेच नाही 'बास' भगवंता

कधी कळणार लोकांना, कसे जिंकायचे तुजला ?
मनी अंधार वसला अन घरी आरास भगवंता

जगाची सर्व दु:खे दूर करणे शक्य का नाही ?
कदाचित तोकडे पडले तुझे सायास भगवंता

वैभव फाटक ( ३ डिसेंबर २०१२)

Wednesday, 24 October 2012

कहाणी

कंठ आहे दाटलेला, मूक वाणी
वाच माझ्या लोचनांमधली कहाणी

साफ केला काळजाचा कोपरा मी
आठवांची जळमटे होती पुराणी

टाकले  होतेस  तू  पाऊल  जेथे
आजही फुलतात बागा त्या ठिकाणी

हक्क माझा राहिला नाही स्वतःवर
ही तुझ्या प्रेमात पडल्याची निशाणी

यायची दु:खा, पुन्हा घाई कशाला
आजही आहे जुने, डोळ्यात पाणी

वैभव फाटक ( २४ ऑक्टोबर २०१२)

Sunday, 7 October 2012

जाहले जीवन सुंदर गीत

आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेते प्रीत..
प्रेम तुझे लाभले, जाहले जीवन सुंदर गीत..

मधाळ वाणी काया गोरी
जणू अप्सरा उभी समोरी..
भान हरपले क्षणात, पाहुन
डोळ्यामधले भाव बिलोरी

एक कटाक्षामधेच झालो चारी मुंड्या चीत
प्रेम तुझे लाभले, जाहले जीवन सुंदर गीत.. II १ II

क्षणात खुलले जीवन माझे
रोम रोम मग झाले ताजे
सूर मिळाले पोकळ वेळुस
मधुर बासरी हृदयी वाजे

फिक्या फिक्या या आयुष्याला केले तू रंगीत
प्रेम तुझे लाभले, जाहले जीवन सुंदर गीत.. II २ II

वैभव फाटक ( ७ सप्टेंबर २०१२)

Sunday, 16 September 2012

चिलखत

पाप भोगतो आहे कुठले ? समजत नाही
सुख आताशा चुकूनसुद्धा फिरकत नाही

कैसे झेलू मी काळाचे वार सारखे ?
मजपाशी आता दैवाचे चिलखत नाही

जिवंत आहे तुझ्यामुळे मी आज, अन्यथा
समईसुद्धा बिनतेलाची तेवत नाही

भेदभाव तू 'मनुष्य' जातीकडून शिकला
तुझ्यात असली कला ईश्वरा उपजत नाही

अपयशास तू जरी टाकले आहे मागे
नकोस थांबू, शर्यत येथे संपत नाही

मी मरताना, हळहळलेले तिला पाहु दे
यमा 'प्राण ने' खुशाल नंतर, हरकत नाही

वैभव फाटक ( १६ सप्टेबर २०१२)

Monday, 27 August 2012

खलाशी

शब्द सांभाळून आहे मी उराशी
दे मुभा, बोलायला थोडे तुझ्याशी

सागरामध्ये जरी एकाच असलो
काठ तू, मी वाट चुकलेला खलाशी

प्राक्तनाने साथ आहे सोडलेली
स्वप्न हल्ली नांदते केवळ उशाशी

विश्व सारे पालथे मी घातल्यावर
स्वर्ग सापडला मला माझ्या घराशी

अन्न जेव्हा गोड लागेना जिभेला
आसवांनी चव दिली तेव्हा जराशी

नेहमी 'मी' ऐवजी 'आपण' म्हणावे
नाळ आपोआप जुळते मग मनाशी

जिंकले साऱ्या जगाला त्याचवेळी
घेतले होतेस जेव्हा बाहुपाशी

--- वैभव फाटक ( २७/०८/२०१२) ---

Thursday, 2 August 2012

वेदनांचा गाव माझा


मी जरी असलो स्वत:चा
ना मलाही ठाव माझा
मी जिथे रमतो सदा तो
वेदनांचा गाव माझा

दु:ख होते दु:ख आहे
ना कधी पर्वा तयाची
हाल माझे पाहिल्यावर
ना गरज सांगावयाची
फुंकरेने जाणिवांच्या
वाळलेला घाव माझा
मी जिथे रमतो सदा तो
वेदनांचा गाव माझा

जीवनाशी झुंजताना
खेळतो मी खेळ काही
देह हा मुर्दाडलेला
जिंकण्याची आस नाही
सावरायाही जमेना
उधळलेला डाव माझा
मी जिथे रमतो सदा तो
वेदनांचा गाव माझा

वैभव फाटक ( २-८-१२)